फुलपाखरू हा आकर्षक रंगांचे पंख असलेला एक कीटक आहे. त्याच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश व कीटक या अवस्था असतात. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. फुलपाखरांच्या रंगीत व मनोहर पंखांमुळे हे कीटक उडताना लक्ष सहजतेने आकर्षून घेतात. हे कीटक लेपिडॉप्टेरा गणातील आहेत. ‘लेपिडॉप्टेरा’ या शब्दाचा अर्थ ‘ज्याच्या पंखावर विपुल खवले आहेत असा प्राणी’ असा आहे. या कीटकांना पातळ पंखांच्या दोन जोड्या असतात. शरीर, पंख व पाय यांवर असंख्य खवले असतात. या कीटकांना जबडे अजिबात नसतात.
फुलपाखरांचे अन्न फुलांतील मध हे होय. त्यांच्या तोंडात एक सोंडेसारखी लांब नळी असते तिला शुंड म्हणतात. फुलांवर बसल्यावर गुंडाळलेली शुंड सरळ करून फुलामध्ये शिरते व तिच्या साहाय्याने मध चोषून घेतला जातो. फुलपाखरांचे शरीर हलके आणि पंख मजबूत व मोठे असल्याने बराच वेळपर्यंत ती हवेत सारखी उडत राहतात. इकडून तिकडे उडत जाताना फुलपाखरू सरळ रेषेत कधीही जात नाही. एकदा वर, तर एकदा खाली ह्याप्रमाणे नेहमी नागमोडी मार्गाने ते उडत जाते.
बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखपाची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो. मादी तिच्या आयुष्यात १०० ते ५०० पर्यंत अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा, पिवळट अगर विटकरी असतो. त्यांचा आकार गोल, चपटा अगर अर्धवर्तुळाकार असतो.