ऐ मेरे वतन के लोगो

ऐ मेरे वतन के लोगो


ऐ मेरे वतन के लोगो हे कवी प्रदीप यांनी इ.स. १९६३ साली भारत-चीन युद्धानंतर, या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हिंदी भाषेत लिहिलेले एक देशभक्तीपर गीत आहे. हे गीत प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविते. भारत-चीन युद्धानंतर खचलेल्या भारतीयांचे मनोबल उंचावण्याचे काम या गीताने केले होते. या गीताला सी. रामचंद्र यांचे संगीत असून लता मंगेशकर यांचा आवाज आहे.


निर्मिती

हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथलेच एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर त्यांनी हे गाणे लिहिले. गीत लिहिल्याच्या दिवसापासून काही आठवड्यानंतर निर्माते मेहबूब खान यांनी रामलीला मैदानावर होणाऱ्या एका कार्यक्रमाच्या उद्‌घाटनासाठी एक गीत लिहावे अशी विनंती कवी प्रदीप यांना केल्यानंतर प्रदीपांनी माहीमच्या फुटपाथवर लिहिलेले हे गीतच संगीतकार सी रामचंद्र आणि गायिका लता मंगेशकर यांना दाखविले.

पहिले गायन

ऐ मेरे वतन के लोगो हे गीत सर्वप्रथम दिल्लीतील रामलीला मैदानावर दिनांक २७ जानेवारी, इ.स. १९६३ रोजी झालेल्या एका कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायिले. या कार्यक्रमाला भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, व सर्व केंद्रीय मंत्री हजर होते. शिवाय चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार आणि गायक मोहम्मद रफी हेही उपस्थित होते. ज्या कवी प्रदीप यांनी हे गीत लिहिले होते त्यांना मात्र या कार्यक्रमाला आमंत्रित केले गेले नव्हते. लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडित नेहरूंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.

इतर

कवी प्रदीप यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गीताबद्दल मिळणाऱ्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी एच.एम.व्ही. या गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता. कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मिळवून दिला. २५ ऑगस्ट २००५ रोजी एच.एम.व्ही कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या संस्थेला दहा लाख रुपये दिले.